कालकथित वासुदेव विठ्ठल जाधव यांच्यासारख्या प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच आंबेडकरी चळवळ जिवंत आहे दादाभाऊ अभंग

Share

मुंबई: डॉ बाबासाहेब आंबेडकर या महासूर्याच्या नेतृत्वाखाली जी पिढी घडली, निर्माण झाली, ज्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं. ज्या पिढीला माहीत होते की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच आमचा उद्धार केला व त्यांचे उपकार आमच्या लाखों पिढ्या फेडू शकणार नाही अशी पिढी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत निष्ठावंत आणि प्रामाणिक राहिली याच पिढीतील वासुदेव विठ्ठल जाधव हे होते. या पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रामाणिक आणि निष्ठेने आयुष्यभर काम केलं कालकथित वासुदेव जाधव यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र संतोष वासुदेव जाधव चालवीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ वाचावा व त्याचा ताबा आंबेडकरी समाजाला मिळावा यासाठी संतोष वासुदेव जाधव स्वतः पुढे येऊन कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीमध्ये सामील झाले व भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क या न्यायालयीन लढ्याला ते साथ देत आहे हे सर्व कालकथित वासुदेव जाधव यांच्या सामाजिक कार्याचा परिपाक आहे. कालकथित वासुदेव जाधव व त्यांच्या पिढीतील कार्यकर्त्यांमुळेच व त्यांच्या कार्याचा वारसा घेतलेल्या आयु. संतोष वासुदेव जाधव सारखे असंख्य तरुणांमुळेच आंबेडकरी चळवळ आज जिवंत आहे असं मत भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कालकथित वासुदेव विठ्ठल जाधव यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले.
रविवार दिनांक १७/८/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, रेसकोर्स, महालक्ष्मी येथे कालकथित वासुदेव विठ्ठल जाधव यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी धार्मिक विधी बौद्धाचार्य रघुनाथ पवार यांनी अत्यंत सुरेख पार पाडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. हेमंत पाटणकर होते. कालकथित वासुदेव जाधव यांच्या जीवन कार्याची माहिती अनेक वक्त्यांनी देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यात समाजभूषण मा.सो.ना.कांबळे (मुंबई प्रदेश उपाध्यक्ष रिपाइंचे आठवले गट), मा.रवीभाऊ गरुड, समाजभूषण भगवान साळवी, आंबेडकरी चळवळीतील नेते बौद्धजन मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष मा.प्रदीप सकपाळ,
बौद्धजन पंचायत समितीचे उपकार्याध्यक्ष मा.अशोक कांबळे, बौद्धजन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष मा.धर्मराज कांबळे, यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र २८१ चे अध्यक्ष सचिन कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांच्या मधुर वाणीने खुसखुशीत भाषेत केले. कार्यक्रमाला कालकथित वासुदेव विठ्ठल जाधव यांच्या पत्नी, भाऊ,भावजया, मुलगे, सुना, मुलगी,जावई, पुतणे,भाचे, नातवंडे, असा मोठा परिवारासह नातेवाईक, मित्रमंडळी तसेच बौद्धजन पंचायती समितीचे अनेक पदाधिकारी व मान्यवर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल जाधव कुटुंबीयांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *