मुंबई: ११ जुलै १९९७ रोजी मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात माथेफिरूने विटंबना केली. विटंबना झाल्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी रमाबाई आंबेडकर नगरात पसरली या विटंबना करणाऱ्या माथेफिरूला अटक करावी यासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करीत असताना पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम याने बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला यात निष्पाप दहा भीमसैनिकांची हत्या घडवून आणली. या घटनेचे महाराष्ट्र सह संपूर्ण देशामध्ये पडसाद उमटले. मोठ्या प्रमाणात जनआंदोलन झाले. त्यावेळी भाजप शिवसेनेचे सरकार होते. सरकारच्या विरोधात आंबेडकरी जनतेने त्यावेळी मोठा प्रमाणात एल्गार पुकारला चौकशी आयोग नेमले. या संधीचा त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मोठा राजकीय फायदा करून घेतला याच घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या घटनेला आज ११ जुलै २०२३ रोजी २६ वर्ष झाली. २६ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना कुठल्या माथेपेरूने केली व तो अजूनही का सापडला नाही? किंवा मनोहर कदम याचे काय झाले? आजही २६ वर्षानंतर हे दोन्ही प्रश्न अनुत्तरीत आहेत. प्रत्येक वर्षी ११ जुलै च्या दिवशी आंबेडकरी भीमसैनिक रमाबाई आंबेडकर नगरातील शहीद भीमसैनिकांना अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज ११ जुलै रोजी घाटकोपर रमाबाई आंबेडकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शहीद स्मारक येथील शहिदांच्या प्रतिमांना अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निर्णायक एल्गारचे संपादक व भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग, एन. डी. एम. जे या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व आंबेडकरी चळवळीचे युवा नेते वैभव गीते, मानवी अधिकार अभियानचे मुंबई प्रदेशअध्यक्ष दत्ता आवाड, रेल्वे कामगार युनियनचे नेते वाय.आर.लोंढे, आदी उपस्थित होते.
