डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जर्सी सिटीमध्ये चौथ्या ‘इक्वालिटी डे’ चा उत्सव स्वाती सावंत यांच्या योगदानासह साजरा

Share



जर्सी सिटी, न्यू जर्सी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२५ रोजी जर्सी सिटीमध्ये ‘इक्वालिटी डे’ साजरा करण्यात आला. या चौथ्या वार्षिक ध्वजारोहण कार्यक्रमाला जर्सी सिटीच्या कौन्सिल अध्यक्ष जॉइस वॉट्टरमन — या जर्सी सिटीच्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला अध्यक्ष — आणि कौन्सिलमन रिच बोग्गियानो — जे यापूर्वी जर्सी सिटी पोलीस विभागात अधिकारी होते — यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात त्यांनी दलित समुदायासोबत डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमात कौन्सिल अध्यक्ष वॉट्टरमन यांनी स्वाती सावंत यांना ‘इक्वालिटी डे’ चा अधिकृत जाहीरनामा सुपूर्द केला. स्वाती सावंत या अमेरिकेमध्ये कायदा व्यवसाय करणाऱ्या काही मोजक्या दलित वकिलांपैकी एक असून, जातीभेदविरोधी खटल्यांत सक्रियपणे युक्तिवाद करणाऱ्या त्या अमेरिकेतील पहिल्या दलित वकील आहेत. त्या सध्या इमिग्रेशन कायदा आणि रोजगार भेदभावविरोधी कायद्यात काम करतात आणि वंचित समुदायांचे प्रतिनिधित्व करतात.
स्वाती सावंत यांनी जर्सी सिटी इमिग्रंट अफेयर्स कमिशनमध्ये पाच वर्षे सेवा दिली आणि ‘इक्वालिटी डे’चा प्रस्ताव मांडला तसेच १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सामाजिक न्याय आणि जातीभेदाविरोधी जागरूकता यासाठी अधिकृत जाहीरनामा तयार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार असून, सामाजिक समतेचे जागतिक प्रतीक मानले जातात.
हा दिवस अधिकृतपणे मान्य करणे सहज शक्य झाले नाही. अनेक महिन्यांचे सातत्याने स्पष्टीकरण देणे, सहकर्मचाऱ्यांना समजावणे, शासकीय विलंब आणि प्रतिकार यावर मात करत ही मान्यता मिळवावी लागली.
बालपणापासूनच स्वाती सावंत यांचे स्वप्न होते की त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या बॅरिस्टर बनाव्यात. हे स्वप्न मुंबईच्या गजबजलेल्या गल्लींत जन्माला आले आणि अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी ते पूर्ण केले. त्यांचा प्रवास फारच वैयक्तिक आणि प्रेरणादायी आहे. त्या एका भाजीविक्रेत्या आजी आणि सिमेंट फॅक्टरीत काम करणाऱ्या आजोबांची नात असून, त्यांचे वडील सातारा जिल्ह्यातील छोट्या खुटबाव गावातून मुंबईत आले. केवळ सहा वर्षांचे असताना, त्यांच्या आजीने त्यांना एका टोपलीत ठेवून मुंबईत आणले. पुढे संपूर्ण गाव मुंबईत स्थलांतरित झाले. त्यांचे वडील घरातील पहिले सुशिक्षित झाले आणि इंजिनिअर बनले. त्यांच्या आई-वडिलांनी मुलगा नसतानाही चार मुलींना शिक्षणात संधी दिली.दलित समाजात मुलगा नसणे ही गोष्ट कमीपणाची समजली जाते, पण स्वातीने ही संकल्पना मोडून काढली. ‘जर मुलगा घराचं नाव पुढे नेत असेल, तर मी ते माझ्या कामातून नेईन — आणि माझ्या आई-वडिलांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने करीन,’ असं त्यांनी ठरवलं.दलित महिला म्हणून स्वातींना जाती आणि लिंग यामुळे दुहेरी भेदभावाचा सामना करावा लागला. सामाजिक दबाव झुगारून त्यांनी अमेरिकेत येऊन आंतरराष्ट्रीय कायद्यात पदव्युत्तर शिक्षण (LL.M.) पूर्ण केले आणि न्यू यॉर्क बार परीक्षा पास केली — ज्यामुळे त्या कायद्याचा सराव करू शकतात. त्या आपल्या कुटुंबातील आणि गावातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी एकट्याने अमेरिकेत येऊन शिक्षण घेतले आणि इथे स्थायिक होत कायद्याचा सराव केला.
“अमेरिकेत एकटी येऊन कायद्याचं शिक्षण घेणं हे माझ्यासाठी केवळ वैयक्तिक यश नव्हतं, ती एक जाहीर घोषणा होती. मी केवळ माझ्या पदवीसाठी लढत नव्हते, तर माझ्यासारख्या पुढच्या एखाद्या मुलीला मोठं स्वप्न पाहता यावं यासाठीही लढत होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *