पुणे जिल्ह्यातील औदर गावातील बाल मनातील होळी….बाळासाहेब मेदगे यांनी सांगितल्या आठवणी

Share

लेखन: बाळासाहेब मेदगे
9004564645

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवसाचं सगळ्या गावांनी स्वागत केले होते.कारण या दिवशी होळीचा सण होता.वसंत ऋतू च्या आगमनाने झाडे वेलि हिरवी गार शाल पांगरून बसली होती.पावसाळ्यातील हिरवे गार दिसत असलेले गवत मात्र आपल्या शेवटच्या घटका मोजत होते.ते कदाचित झाडाकडे बघून विचार करत असेल मी पण तूमच्या सारखे रूप जेष्ठ महिन्यात धारण करेल. लहानपणी पौर्णिमेचा चंद्र दाखवत असताना आई अंगाई गीत बोलत असे ! निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही! गाईच्या शेणाने अंगणाला शेण सडा घातलेला असे आणि त्यामध्ये आम्हाला झोप येण्यासाठी चंद्राकडे बोट दाखवून चांदोबा पण झाडामागे झोपला बघ, असे केविलवाण्या स्वरात समजावत असे ,दिवस भर काबाड कष्ट केलेल्या आई बाबांची पुरती दमछाक झालेली असायची आम्हाला त्याची कल्पनाच नसायची आम्ही आमच्याच थाटात असे, आम्ही झोपल्याशिवाय आईला झोप येत नसायची हे वात्सल्य युक्त प्रेम कळण्या इतपत आम्ही मोठे झालो होतो. पौर्णिमेच्या चंद्राची शीतल छाया वातावरणात गारवा तयार करत होती. थंडी हळू हळू कमी होऊ लागली होती ,तिची सुद्दा सुट्टी होण्याची वेळ आली होती.होळीच्या दिवसाची वाट चाकर मानी विशेष पहात होते.कारण आपल्याला न आवडणारी चाकरी याच दिवशी सोडली जात होत होती. नामाने वर्षभर इमाने इतबारे चाकरी करत असताना बरेच सहन केले होते.घरधणी आणि घरधणीनं थोडया थोडया चुकीवरून त्याला फटकारत होते .त्याची चीड मनात ठेवून कधी होळी येईल असे त्याला वाटत होते . नवीन कपडे मांजरपाठ स्वरूपात पण त्यामध्ये सुद्दा खूप आनंद दडलेला होता. नव्याने चाकरी मिळणार होती.म्हणून नामा भलताच खुश झाला होता.
इकडे पांडुरंग सखाराम मेदगे (बाबा) यांनी दोन दिवस अगोदर आपल्या शेतात लोढ घालून सपाट केले होते.ज्या ठिकाणी गावाची सार्वजनिक होळी पेटणार होती. सांयकाळी पाच वाजले होते.प्रत्येक जण आप आपल्या घरातील थोराड लाकूड आणत होता. राजाराम मामाची हालगी, आणि पोपट भालेरावची पिपाणी
सर्व तयारीनिशी होळीच्या शेतात हजर होती. गावचे पाटील महादेव स मेदगे यांनी गुलाल लावून त्यांच्या कार्याला सुरवात करण्याची विनंती केली होती.हालगी पिपाणी चा आवाज सगळ्या पंचक्रोशी मध्ये गाजत होता. आनंदाच्या लाटेत आम्ही मुले स्वार होण्यास तयार झालो होतो.मोजक्याच मुलाच्या गळ्यात साखरेच्या गाठी असलेल्या माळा होत्या.त्या होळी आईला वहाण्यासाठी आणल्या होत्या. होळी लावण्यासाठी गावातील जुनी जाणती मंडळी जमा झाली होती.इकडे प्रत्येक घरातून पुरण पोळी जेवण बनवण्याची लगबग चालू होती.चुलीवर शिजत असलेलं पुरण आपल्या मनमोहक अंदाजाने सगळ्यांचे लक्ष खेचत होते.आमची मात्र होळीच्या बाजूने बोंबा बोंब करण्याची तयारी चालू होती.जुनी माणसे आम्हाला प्रोत्साहन देत होती. हालगी पिपाणी चा आवाज आणि आमची बोंबा बोंब करण्याची वेळ एकच झाली होती.शेतातली कामे उरकून शेतकरी राजा होळीच्या ठिकाणी वाईट विचाराचं दहन करण्यासाठी जमा झाला होता.पाटलांनी साद घातली होती.मंडळी होळी पेटवायची का? सगळी मंडळी असल्या कारणाने सगळ्यांनी एका सुरात हो म्हणून सांगितले होते.पाटील म्हणजे मनमिळाऊ व्यक्तित्व गावाला पाटील शोभुन दिसत होते. म्हताऱ्या लोकांचा आवडता चेहरा म्हणून त्याना पसंती दिली जात होत होती.पाटलांनी आपल्या धोतराचा सोगा आवरला गवताची पेंढी हातात घेऊन शानदार पद्दतीने रचलेल्या होळी आईला पेटवण्यासाठी पुढे झाले होते.होळी पेटली होती.आगीच्या ज्वाला गगनाला भिडण्याचा प्रयत्न करत होत्या. वातावरणातील गारठ्याला
त्या ज्वालानी काहीसे नष्ट केले होते.आम्हाला खूप मजा येत होती.आम्ही होळी आईच्या बाजूनी गोल रिंगण धरले होते.बोंब यांच्या साठी आम्हाला करायला सांगत होते की जेणे करून गावावर आलेले संकट पळून जावे ,वाईट सवयी, विचार, या होळीच्या अग्नी कुंडात लोप पावावे.आम्ही जोरा जोरात बोंब मारत होतो. थोड्या वेळाने घरातील पुरण पोळीचा नैवेद्द्य जो तो घेऊन होळी आई शेजारी पोहचला होता. सगळ्यांनी वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाचा भरपूर आनंद घेतला होता.पाटलांनी आम्हा पोरांना सक्त ताकीद दिली होती.पोरानो पाच दिवस होळी विझली नाही पाहिजे.त्याचे बोल आमच्या साठी शिरसावनद्य होत.मग आम्ही घरी गेलो होतो.घरी पुरण पोळी तूप जेवणाचा मस्त अंदाज होता.घरातील म्हशीच साजूक तूप या सणाला हमखास मिळत होते.सगळ्या जेवणात पोट भरून जेवण कोणते असेल तर ते पुरण पोळी च जेवण करून झाल्या नंतर आम्ही होळी विझुन द्यायची नाही या विचाराने तिच्या पाशी झोपण्यासाठी गेलो होतो .प्रत्येकाने आपली लाकडे होळी पेटण्यापूर्ती दिली होती.पण ती पाच दिवस आम्हाला विझुन द्यायची नव्हती म्हणून रात्री आम्हाला मोठे कामच मिळाले होते.ज्याच्या दरवाज्यात मोठे लाकूड असेल ते गुपचूप घेऊन जायचे आणि होळी आईला अर्पण करायचे हा आमचा पाच दिवस ठरलेला कार्यक्रम असायचा ,दुसऱ्या दिवशी पहाटे घरातील सासुरवाशीण पहिली पाण्याची खेप होळी ला वहात होती.गावची विहीर लांब होती तरी थोडा सुद्दा कंटाळा त्याना येत नसायचा. सकाळी सात वाजले होते.आमची सोंग काढण्याची वेळ झाली होती.तोंडाला राख फासून कोळसा उगाळून मिशी काढणे कानात बटाटा अडकून ,हातात पत्र्याचा डबा वाजवत मारुती रायाच्या चरणी पहिलं गाणे बोलायचा हा बेत सगळ्याना समजला होता.तत्पूर्वी काही मुले गावात कोण चप्पल घालून येतो का त्याची पहाणी करण्यासाठी तयार झाली होती.ज्याच्या पायात चप्पल त्याच्या कडून एक नारळ किंव्हा 5 रुपये घेतले जायचे
मारुती रायाला प्रदक्षणा करून प्रत्येकाच्या घरा पुढे सोंग वाजवून गुळ खोबरे पैसे घेऊन परत होळी आई शेजारी आम्ही आलो होतो.गूळ खोबरे सगळ्या पोरांना समान वाटले जायचे व पैसे सुद्दा 10 ते 50 पैश्या पर्यंत वाटणी येत होती.बटाटा त्या वेळी काढणी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बटाटे आणून भाजत बटाट्याचा स्वाद पाच दिवस घेत होतो.
हिंदू धर्मातील पवित्र होळी च्या सणाला नतमस्तक होत
त्या होळी ला विसरणं म्हणजे अक्षम्य अपराध होईल.

लेखन :बाळासाहेब मेदगे

मु. औदर, ता. खेड, जिल्हा पुणे

मोबाईल नंबर: 9004564645

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *