सर्व समाजातील सफाई कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र महामंडळ बनवण्यात यावे… दादाभाऊ अभंग
डोंबिवली: जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून सफाई काम करणारे कामगार यातील सरकारी व निमसरकारी कामगारांसाठी सरकारचं संरक्षण असतं परंतु जे खाजगी क्षेत्रामध्ये किंवा सोसायटीतील इमारतींमध्ये काम करतात अशा सफाई कामगारांना कुठल्याही प्रकारचं आरोग्य, आर्थिक संरक्षण नाही जर त्यांच्या जीवाला काही झालं तर त्यांच्या कुटुंबाचे काय? व ती कशी जगणार? तर सफाई कामगारांचे पूर्ण संरक्षण व्हावे म्हणून सफाई कामगारांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र असं महामंडळ स्थापन करावं अशा प्रकारचं मनोगत डोंबिवली येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रसिद्ध स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक व निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी शिवाजीराव म्हस्के यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्था या संस्थेच्यावतीने आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते शिवाजीराव म्हस्के यांनी मागील ४० वर्ष आंबेडकरी चळवळीत व सामाजिक कार्यात केलेले कार्य तसेच अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार डोंबिवलीतील इंदिरानगर या वसाहतीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्कारमूर्ती शिवाजीराव म्हस्के यांनी आपण मागील ४० वर्ष सामाजिक काम करत असताना अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन त्या काळामध्ये झोपडपट्टीतील बांधवांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळवून देण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यात प्रयत्न केलेला आहे. आंबेडकरी चळवळीने मला सर्व काही दिलेले. मी आंबेडकरी चळवळी काम करत असताना झोपडपट्टीतील आपल्या समाज बांधवांचे प्रश्न असतील किंवा कुठल्याही इतर समाजाचे प्रश्न असतील त्या प्रश्नांसाठी मी पाठपुरावा करून अनेक आंदोलने केली व आजही आंदोलने करत आहे. हा सत्कार भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेशभाई छापरवाल यांनी केल्याबद्दल मी संस्थेचे व त्यांचे आभार मानतो. या सत्कारामुळे माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पुढील सामाजिक काम करण्यासाठी एक मोठी ऊर्जा मिळाली आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा एक सच्चा भीमसैनिक असून यापुढे सुद्धा सामाजिक काम करीत राहील असे सत्काराला उत्तर देताना मनोगत शिवाजीराव मस्के यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कल्याण – डोंबिवली जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे नेते व झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नांवर सतत लढा देणारे माणिकराव उघडे यांनी शिवाजीराव म्हस्के यांच्या सामाजिक व आंबेडकरी चळवळीत केलेल्या कार्याच्या अनेक आठवणी सांगितल्या व शिवाजीराव म्हस्के यांनी कशाप्रकारे दोन रुपयांमध्ये माझ्यासह अनेक झोपडीधारकांना रेशन कार्ड मिळवून दिले ही आठवण सांगताना शिवाजीराव म्हस्के हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो. यावेळी बहुजन टायगर सेनेचे विपुल वाघमारे यांनी शिवाजीराव म्हस्के यांच्या कार्याच्या अनेक आठवणी सांगितल्या व त्यांना शुभेच्छा दिल्या. ॲड. मीना बागडे, सतीश देशमुख पत्रकार प्रशांत गायकवाड यांनी सुद्धा शिवाजीराव म्हस्के यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारतीय वाल्मिकी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशभाई छापरवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद उघाडे यांनी केले व आभार विपुल वाघमारे यांनी मानले.
