खेड: महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा हे मित्र पक्षांच्या जिंकणाऱ्या जागा स्वतःकडे घेवून महायुतीच्या उमेदवारांना विजयाचा मार्ग सोपा करतो हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने अशाच मित्र पक्ष सहज जिंकणाऱ्या जागा स्वतःकडे घेवून महायुतीला खूप मोठी मदत केली आहे. लोकसभा निवडणुकीत २१ जागा लढवून केवळ ९ जागा जिंकल्या व बाकीच्या जागा महायुती ला आंदण दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने केवळ १० जागा लढवून ८ जागांवर विजय मिळविला तर काँग्रेसने १७ जागा लढवून १३ जागांवर घवघवीत यश मिळवले. सांगली हा काँग्रेसचा गड असून ही शिवसेना (उबाठा) ने अडेलतट्टू भूमिका घेवून सांगलीची जागा घेतली व विजय तर दूरच सांगलीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये शिवसेना (उबाठा) यांच्याच उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे. आता विधानसभा निवडणुकीतही हाच फंडा सुरू असून मित्र पक्षाच्या जिंकणाऱ्या जागा घेवून महायुती उमेदवारांचा विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार अतुल देशमुख यांनी मागील पाच महिन्यात बांधलेला मतदारसंघ व त्यांच्या स्वतःची पन्नास हजार मतांची ताकद या जोरावर ते सहज विजय झाले असते पण आघाडीतील घटक पक्षाने बालहट्ट करून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ आम्हालाच पाहिजे असे करून त्यांनी दिलीप मोहिते यांचा विजय निश्चित केला आहे अशी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मतदार चर्चा करीत आहे.
