►वार्ताहर कराड
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असून ही आपली अस्मिता आहे. हा ऐतिहासिक विजयस्तंभ अतिक्रमणांत असून मागील अनेक वर्षापासून समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग प्रशासकीय व न्यायालयीन लढाई लढत असून आपण सर्वांनी या न्यायालयीन लढ्यात सामील होणे आवश्यक असून साताऱ्यातील बौद्ध समाजातील जनतेने या लढ्यात सामील व्हावे असे कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष आनंदराव लादे यांनी साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थितांना आवाहन केले.
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवार दिनांक २१ जून रोजी शासकीय विश्रामगृह कराड येथे कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रा. दिलीप लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या कराड दक्षिण तालुका अध्यक्षपदी सुवर्णा विठोळे यांची निवड करण्यात आली. तर कराड शहर अध्यक्षपदी वनिता कांबळे व शहर उपाध्यक्षपदी कोमल शिंदे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समितीचे प्रदेश संघटक सचिव प्रा दिलील लोखंडे यांनी भीमा कोरेगावची ऐतिहासिक लढाई, इतिहास व विजयस्तंभाचे अतिक्रमण सर्व सविस्तर माहिती उपस्थितांना देऊन विजयस्तंभ न्यायालयीन लढ्यात सामील होऊन भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण मुक्त करायचा आहे. त्यामुळे आपल्यातील आपसातील मतभेद दूर ठेवून हा न्यायालयीन लढा लढायचा आहे व जिंकायचा आहे. यासाठी सर्वांनी तन मन आणि धन देऊन या लढ्यात सामील व्हावे असे आवाहन प्रा. दिलीप लोखंडे यांनी केले.
यापुढे साताऱ्यातील प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती होणार असून इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन समितीचे जिल्हाअध्यक्ष आनंदराव लादे यांनी केले. कराड तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर केल्या. यावेळी वैभव कांबळे, दिनकर कांबळे, मनिषा कांबळे, दिलीप आहिरे, अरविंद रविंद गायकवाड, विद्या वाडते व कार्यकर्ते उपस्थित होते.
लवकरच साताऱ्यात जनसंपर्क अभियान सुरू करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी सांगितले व उपस्थितांचे आभार मानले.
