मुंबई: माजी आमदार टी.एम. कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं म्हणून त्यांनी मोठा संघर्ष केला होता लढ्याचे नेतृत्व केले होते. ज्यांना जमीन नाही त्यांना गायरान जमिनी मिळवून दिल्या. शेतकरी, कामगार, वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी त्यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला व त्यांना न्याय मिळवून दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) पक्षाची स्थापना करून या पक्षाच्या माध्यमातून मोर्चे, आंदोलने केली. आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता व समाजबाधवांसाठी आमदार टी.एम. कांबळे यांनी संपूर्ण आयुष्यभर काम केलं. आज हेच कार्य त्यांचे सुपुत्र कनिष्क टी. कांबळे करीत आहे. टी. एम. कांबळे यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) या पक्षाला आंबेडकरी समाजबांधवांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील विचारवंत दादाभाऊ अभंग यांनी माजी आमदार टी.एम. कांबळे यांच्या जन्मदिन कार्यक्रमाप्रसंगी केले.
आमदार टी एम कांबळे यांचा जन्मदिन ९ जुलै असून आज दिनांक ९ जुलै २०२५ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) पक्षाचे युवक अध्यक्ष कनिष्क टी. कांबळे यांनी घालून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक चे मुंबई सरचिटणीस विशाल नावकर यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) या पक्षाचे नेते अनिल साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) या पक्षाचे छत्रपती संभाजी नगर युवक अध्यक्ष सचिन गंगावणे, धाराशिव जिल्ह्याचे नेते राज धज यांनी आमदार टी. एम.कांबळे यांच्या आठवणी सांगून अभिवादन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाचे युवक अध्यक्ष कनिष्क टी कांबळे यांनी आगामी निवडणुका पक्ष ताकदीने लढणार असून आपण या पक्षात सामील व्हा आपल्याला न्याय दिला जाईल असे आवाहन केले. यावेळी देविदास दांडगे, अनिल वाघमारे,अव्वल शहा, शंकर भाई, दत्तात्रय व्यापारी, सलमान भाई, महिला आघाडीच्या वैजयंताताई गायकवाड, तेजाताई गायकवाड उपस्थित होते.
