मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचा श्वास आहे आमची अस्मिता व अस्तित्व आहे आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुणी अवमान करेल तर आम्ही त्या अवमान करणाऱ्याच्या विरोधामध्ये आंदोलन करू ज्याने अवमान केला त्याला अटक करण्यासाठी रस्त्यावर उतरू यात आमचा जीव गेला तरी चालेल पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान सहन करणार नाही हा संदेश रमाबाई आंबेडकर नगरातील शहीद भीमसैनिकांनी ११ जुलै १९९७ रोजी जगाला दाखवून दिला. आपल्या जिवाची पर्वा न करता या भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकर यांच्या अस्मितेसाठी आपला प्राण दिला आणि म्हणून जोपर्यंत असे भीमसैनिक आंबेडकरी चळवळीमध्ये आहे तोपर्यंत आंबेडकरी चळवळ ही मजबूत आहे. आंबेडकरी जनतेने आगामी खडतर काळामध्ये संघटीत होऊन चळवळ मजबूत करावी असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी घाटकोपर मधील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये शहीद भीमसैनिकांना अभिवादन करताना केले.
११ जुलै १९९७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान झाला. अवमान करणाऱ्याला ताबडतोब अटक करा या मागणीसाठी रमाबाई आंबेडकर नगरातील भीमसैनिकांनी रस्त्यावर शांतपणे आंदोलन केलं परंतु या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी तत्कालीन एसआरपीचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम याने बेछूट गोळीबार करून दहा भीमसैनिकांची हत्या घडवून आणली या शहीद भीमसैनिकांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी ११जुलै रोजी रमाबाई आंबेडकर नगरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना व शहीद भीमसैनिकांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतो. यावेळी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहिदांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सामूहिक अभिवादन केले. तसेच शहीद स्मारक येथील शहीद भीमसैनिक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कोरेगाव भिमा जयस्तंभ बचाव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी अभिवादन केले.
यानंतर कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची एक बैठक शहीद स्मारक येथे संपन्न झाली. या बैठकीत भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालय लढा या विषयावर दादाभाऊ अभंग यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात आली. यावेळी संजय शिंदे, विलास काळे महावीर कांबळे, मुकेश मून,राजेंद्र वाघमारे, संगीताताई तेलंग,धम्मदीप बनसोडे, नागेश शिर्के, जयेंद्र गायकवाड, सुनील अभंग, आकाश किरतकर, सुमित थोरात, अश्वजीत सोनवणे, हुशार माघाडे, राहुल गांगुर्डे, स्टार राहुल नरवणे उपस्थित होते.. कार्यक्रमाचे आयोजन कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे घाटकोपर तालुका पूर्व अध्यक्ष कुणाल बागुल व घाटकोपर तालुका पूर्व (महिला) अध्यक्ष आयु. स्नेहाताई उमेश गांगुर्डे यांनी केले.
