मुंबई दि.१२ : धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला (सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाऊस क्रमांक २) या वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा अशा सूचना महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
विधानभवन येथे धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला या वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी मुंबई येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी विधानभवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे व सामाजिक न्याय विभागाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सह सामाजिक न्याय विभाग धुळे चे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे आणि संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे चे प्रमुख आनंद सैंदाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाठ, पूज्य भंन्ते आनंद थेरो, जेष्ठ पत्रकार व भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग, गड्ड्या पहेलवान आघाव , विजय सुर्यवंशी, शोएब शेख आदी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपाध्यक्ष बनसोडे यांनी बैठकीत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत मोलाची आहे. त्यामुळे तिचा ऐतिहासिक वास्तूत समावेश करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.
जिल्हाधिकारी धुळे श्रीमती विसपुते यांना त्यांनी सूचना दिल्या की, संबंधित जागेचे कागदपत्रे त्वरित यंत्रणेकडून घेवून अद्यावत करून ठेवावेत. तसेच या विषयावर सामाजिक न्यायमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देताना उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले की, धुळेकरांसाठी ही वास्तू अभिमानाची बाब असून, डॉ. आंबेडकरांच्या स्मृतींशी निगडीत हा ठेवा ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.या निर्णयामुळे धुळे शहराला आणखी एक ऐतिहासिक ओळख मिळणार असून, पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जतन होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक उपायुक्त व बांधकाम विभागाच्या मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी सदर प्रस्ताव हा शासनाकडून मंजूर करण्याची जबाबदारी बनसोडे यांनी घेतल्याने लवकरात लवकर हे स्मारक मंजूर होऊन बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित स्थळांमध्ये संदेशभूमीचा समावेश करण्यात येणार असल्याचे अण्णासाहेब बनसोडे यांनी म्हटले आहे.
सदर बैठक लावण्यासाठी कैलास भाऊ चौधरी यांनी शिफारस केली होती.
