विषमतावादी विचार प्रवृत्तीला रोखण्यासाठी आज महापुरुषांच्या सामाजिक समतेच्या विचारांची गरज: दादाभाऊ अभंग

Share

मुंबई: देशात आणि राज्यात सध्या काही धर्मांध, जातीयवादी व विषमतावादी विचारांच्या शक्ती स्वार्थी राजकारणासाठी भारताची संविधानिक मूल्ये बाजूला करून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणून हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करू इच्छित आहे.अशा जातीयवादी, धर्मांध, विषमतावादी प्रवृत्तीला रोखण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची आज गरज आहे असे प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महामानव विचार प्रबोधन मंच यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानात ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेचे विचारांची आज राष्ट्राला गरज’ या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक समतेच्या विचारांसाठी संपूर्ण आयुष्यभर काम केले. क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक घटकांना न्याय मिळवून दिला. करवीर संस्थानात ५० टक्के आरक्षण देऊन त्यांनी उपेक्षित, शोषित, वंचित सर्व जाती धर्माच्या घटकांना न्याय मिळवून दिला. शिक्षण सक्तीचे करून ते मोफत केले. अनेक नवीन शाळा काढून विद्यार्थांसाठी वसतिगृहे निर्माण केली. शाळा केवळ पुस्तकी न ठेवता विविध कला कौशल्ये असलेल्या शाळा तसेच व्यवसायासाठी पूरक ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचे काम केले तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी त्यांनी कुस्तीचे आखाडे निर्माण करून अनेक कुस्तीगीर पैलवान निर्माण केले. छत्रपती शाहू महाराजांनी महिलांसाठी अनेक नवीन कायदे करून त्यांना न्याय मिळवून दिला. विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, घटस्फोटित व वारसा कायदा देवदासी प्रथा बंद कायदा असे कायदे बनवून महिलांना सामाजिक न्याय मिळवून दिला. शेती, जलसिंचन, धरण, रोजगार शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कर्ज असे अनेक कामे त्यांनी करवीर संस्थानांमध्ये केली आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी व लोकराजा असे म्हटले जाते. छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप चांगले ऋणानुबंध होते हे या दोन महापुरुषांनी एकमेकांना केलेला पत्रव्यवहार यावरून दिसून येतो. छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक समतेच्या विचारांचे दीपस्तंभ होते. अशा महापुरुषांच्या विचारांची देशाला आणि राज्याला गरज आहे असे मत दादाभाऊ अभंग यांनी व्यक्त केले.
सध्या देशात काही धर्मांध, जातीवादी प्रवृत्तीचे लोक स्वार्थी राजकारणासाठी या देशांमध्ये संविधान विरोधात काम करून हुकूमशाही आणि पहात आहे परंतु अशा प्रवृत्तीच्या लोकांना रोखण्यासाठी सर्व महापुरुषांच्या सामाजिक समतेच्या विचारांची आज राष्ट्राला व राज्याला गरज आहे असे दादाभाऊ अभंग यांनी व्याख्यानाच्या समारोपामध्ये आपलं मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा सोनवणे (सातारा) यांनी केले तर स्वागत प्रतीक्षा कांबळे (सातारा) यांनी मानले. प्रातिनिधिक मनोगत छाया धाइंजे (पुणे) यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन वाघमारे (पुणे) व आभार ज्ञानदेव जाधव( पुणे) यांनी मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.सर्व उपस्थितांचे संयोजक यांनी आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *