डोंबिवली: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, शेती, रोजगार, शारीरिक विकास यांच्यासह आपल्या संस्थानात जे शोषित, पीडित, वंचित आहेत अशा सामाजिक न्यायापासून वंचित सर्व जाती धर्मातील घटकांना आरक्षण देऊन सामाजिक न्याय दिला. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत चांगले ऋणानुबंध होते. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांशी केलेला पत्रव्यवहार हा या दोन महापुरुषांच्या अत्यंत जवळचे संबंधाचा एक मोठा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात सर्व जाती धर्म घटकांना न्याय दिला. आंतरजातीय विवाह, विधवा महिला पुनर्विवाह, महिलांचा आर्थिक विकास असे महिलांसाठी त्यांनी प्रचंड असं काम केले आहे. छत्रपती शाहू महाराज हे करवीर संस्थानाचे राजे होते. आपल्या राज्यातील जनतेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शाहू महाराज यांनी विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात बंड करून सामाजिक समतेचा विचार रुजवला असे मनोगत प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग यांनी डोंबिवलीत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी कार्यक्रमात व्यक्त केले. छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती महोत्सव २६ जून २०२३ रोजी डोंबिवली येथील संविधान चौक (रामनगर) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जयंती कार्यक्रमानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव आंभोरे, कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे रिपाई नेते माणिकराव उघडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे खजिनदार सिद्धार्थ रणपिसे, उद्योग आघाडीचे सतीश जाधव, बामसेफचे गौतम वाघचौरे, भास्कर त्रिभुवन आझाद समाज पार्टीचे दामोदर काकडे, कवी दीपक साळवे, महादू सिंग राणाशेठ यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष किशोर मगरे, संघटक वसंत टेकाळे, राजू दोंदे, बापू अहिरे, चंद्रकांत ठुकरल, गजानन काकडे, दयानंद गायकवाड, दीपक इंगळे, सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तुकाराम पवार यांनी केले. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे नेते माणिकराव उघडे यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.
