मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी निष्ठा असलेले प्रामाणिक कार्यकर्ते हे सत्तेपेक्षा शरद पवार यांच्या वरील निष्ठेला प्राधान्य देत असून आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व शरद पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते देवदत्त निकम यांनी आपण व असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे जाहीर केलं आहे. देवदत्त निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. देवदत्त निकम हे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून गणले जात असले तरी शरद पवार हेच माझे नेते असून मी शरदचंद्रजी पवार यांच्या सोबतच राहणार आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. आगामी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना आम्ही सर्व निष्ठावंत निवडून आणू असे देवदत्त निकम यांनी सांगितले. देवदत्त निकम यांनी दोन महिन्यापूर्वीच दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात बाजार समितीला पॅनल उभा करून निवडून आणला आहे. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते यामुळे अनेक कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती. दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या विरोधात गेल्याने असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते शरद पवारांच्या सोबत आता मोकळेपणाने पक्षात काम करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिली सभा ही आंबेगावमध्ये शरद पवार घेणार असून यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आंबेगाव तालुका हा निष्ठावंतांच्या पाठीशी खंबीपणे उभा असेल असे आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवदत्त निकम यांनी सांगितले.
