भीमा – कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांना ‘द रियल पॅंथर’ हा पुरस्कार मुंबईत मान्यवरांच्या हस्ते प्रदान

Share

मुंबई: भीमा- कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेची मालकी हक्क न्यायालयीन लढाई भीमा -कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीच्या माध्यमातून मागील पंधरा वर्ष प्रशासकीय व न्यायालयीन पातळीवर लढत असलेले भीमा – कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांना ब्लू टायगर सामाजिक संस्थेच्या वतीने द रियल पँथर हा पुरस्कार मुंबईतील शहीद स्मारक, रमाबाई कॉलनी, घाटकोपर (पूर्व) येथे रविवर दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते तानसेनभाई ननावरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्लू टायगर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाळराजे शेळके होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी केले. द रियल पँथर हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर भीमा- कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शेवटचा श्वास असेपर्यंत भीमा- कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जमिनीच्या मालकी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढत राहणार आहे या न्यायालयीन लढाईत समाजाने सर्व ताकदीने साथ दिली पाहिजे कारण माळवदकर कुटुंबाने ज्या पद्धतीने या जागेचा कब्जा केला आहे तो बेकायदेशीर आहे. तरी आपण सर्वांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालय लढाईत सहभाग घ्यावा अशी विनंती सर्व उपस्थितांना केली. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दलित पॅंथर व त्या काळामधील घडामोडी व आजचे वास्तव यावर विस्तृतपणे सांगितलं व दलित पॅंथर या संघटनेवर ज्यांनी ज्यांनी पुस्तके यापूर्वी लिहिली आहेत व आज लिहीत आहेत त्यांच्या सोयीप्रमाणे पुस्तक लिहीत आहेत मुळात दलित पॅंथर या संघटनेचे सत्य पुस्तक यायला पाहिजे ते आलं नाही अशा प्रकारची खंत व्यक्त अविनाश महातेकर यांनी व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते व युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तानसेनभाई ननावरे यांनी रिपब्लिकन चळवळ, दलित पॅंथर आणि आताची राजकीय परिस्थिती यावर चांगले विश्लेषण केले. आज तरुणांनी रिपब्लिकन चळवळीमध्ये कशा प्रकारचे काम केलं पाहिजे, कशा प्रकारचं लोकांपर्यंत जाऊन लोकांना जागृत केलं पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाने या चळवळीत सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरांमध्ये घेवून जायला पाहिजे असे सांगून तानसेनभाई ननावरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संयोजकांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *