के.सी.ओव्हाळ यांनी आंबेडकरी चळवळीत काम करत असताना मुलांनाही शिक्षित आणि सुसंस्कृत केले…दादाभाऊ अभंग

Share


बदलापूर: (प्रतिनिधी) आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कालकथित के.सी. ओव्हाळ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक लढ्यात सहभाग घेतला पण चळवळीचे काम करत असताना त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षित व सुसंस्कृत करण्याचं महत्वपूर्ण काम केलं असे मत निर्णायक एल्गारचे संपादक दादाभाऊ अभंग यांनी कालकथित के. सी. ओव्हाळ यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रद्धांजली अर्पण करताना मांडले. के.सी.ओव्हाळ यांचे गाव वाळद तालुका खेड, जिल्हा पुणे हे असून त्यांनी त्यांचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलं. शासनाच्या लेखापरीक्षक म्हणून काम करताना गावातील तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थामध्ये त्यांनी काम केलं. विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये आंबेडकरी चळवळीचं काम करीत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी अनेकांना मदत केली. अनेकांना सहकार्य केलं व चळवळीसाठी योगदान दिले पण हे सर्व करताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडे अधिक लक्ष देऊन तुम्ही मुले व एक मुलगी सुशिक्षित आणि सुसंस्कृत केली व आज ही मुले सामाजिक चळवळीचा वारसा चालवीत आहे. शिक्षणाबाबतीत के.सी. ओव्हाळ हे आग्रही होते याचा स्व अनुभव दादाभाऊ अभंग यांनी सांगून के.सी. ओव्हाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली. बदलापूर येथे तुलसी विहार कम्युनिटी हॉल, बदलापूर( प ) येथे कालकथीत के.सी.ओव्हाळ यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. भवतू सब्ब मंगलम चे संस्थापक शांतू डोळस, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते सुमेध जाधव, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे नेते विजय पवार, सुरेश कोळगे, संभाजी सोनवणे, महादू सरवदे, डी.एन. काळे, ज्ञानेश्वर सोनवणे, अशा अनेक मान्यवरांनी के.सी. ओव्हाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनेक मान्यवरांनी के. सी . ओव्हाळ यांच्या सामाजिक, शैक्षणिक कामाच्या आठवणी आणि अनुभव सांगितले. यावेळी के.सी. ओव्हाळ यांचा परिवार, नातेवाईक व मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. या पुण्यानुमोदन अभिवादन सभेचे सूत्रसंचालन नंदकुमार कांबळे यांनी केले .
पुण्यानुमोदान कार्यक्रमाचा धार्मिक विधी भंते डॉ.एन. आनंद महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. भंते डॉ. एन.आनंद महाथेरो यांनी उपस्थितांना धम्म देसना दिली. के. सी. ओव्हाळ यांचे कुटुंबीय पत्नी आयुष्यामती जयश्रीताई ओव्हाळ, त्यांचे तीन मुलगे सत्येंद्र ओव्हाळ, प्रशांत ओव्हाळ, अभिजीत ओव्हाळ व त्यांच्या तिन्ही सुना, नातवंडे यांनी उपस्थित भंते यांना चिवरदान केले. उपस्थित सर्व मान्यवर व ओव्हाळ कुटुंबीय यांचे नातेवाईत, मित्र परिवार यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *