बदलापूर: भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि विजयस्तंभाच्या परिसरातील जागेवर रखवालदार माळवदकर कुटुंबाने अतिक्रमण केले असून त्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग समितीच्या वतीने न्यायालयीन लढाई लढत आहे. भीमा कोरेगाव जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागा ही न्यायालयीन वादात असल्यामुळे प्रत्येक वर्षी मागील सहा वर्षापासून १जानेवारी शौर्य दिन कार्यक्रमासाठी न्यायालयीन परवानगी घ्यावी लागते. याची कुठलीही माहिती आंबेडकरी समाजाला माहीत नाही व त्यांनी ही कुणाला विचारले नाही. केवळ १ जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाच्या वेळी भीमा कोरेगावला जातात व नंतर वर्षभर विसरून जातात. १ जानेवारी शौर्यदिनासाठी न्यायलयीन परवानगी ही प्रक्रिया बंद करायची असेल व हा जयस्तंभ अतिक्रमणातून मुक्त करायचा असेल तर आपल्याला भीमा कोरेगाव चा विजयस्तंभ आणि परिसरातील जागा अतिक्रमण मुक्त केली पाहिजे. आंबेडकरी समाजातील सर्व राजकीय पक्ष, संघटना आणि संस्थांनी आपसातील व्यक्ती द्वेष, मतभेद बाजूला ठेवून या लढ्यास साथ द्यावी असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी बदलापूर येथे केले.
मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांची एक मुलाखत घेतली होती व या मुलाखतीत दादाभाऊ अभंग यांनी सांगितले होते की ही न्यायालयीन लढाई ही लोकाभिमुख व समाजाभिमुख झाली पाहिजे. नेमका या जमिनीचा वाद काय आहे व पुढील आपली रणनीती काय असावी हे समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आपण जनजागृती अभियान बैठका घेवू याचाच भाग म्हणून विद्रोही कवी पँथर वाय आर. लोंढे व समाजसेवक, उद्योजक सुभाष खैरनार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक बदलापूर नगरीत पवार कॉम्प्लेक्स, बदलापूर (प ) येथील बुद्ध विहारात एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. अनेकांनी आपापली मते मांडली. न्यायालयीन प्रक्रियेमधील नेमका वाद काय आहे व तो कसा सुटू शकेल हे समजून घेतले व पुढील न्यायालयीन रणनीती यावर चर्चा केली या लढ्यामध्ये आम्ही सर्व सोबत असू असे सर्वांनी एकमताने सांगितले या बैठकीला आंबेडकरी चळवळीचे विद्रोही कवी पँथर वाय.आर.लोंढे, समाजसेवक व उद्योजक सुभाष खैरनार, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र नवगिरे, आंबेडकरी चळवळीचे गायक संजय गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे एल.एस.जाधव गुरुजी, सुनील लोखंडे, बाजीराव बोर्डे, शांताराम कदम, आशिष जाधव, रोहन नवगिरे, गौतम खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.
