कल्याण: भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि विजयस्तंभाच्या परिसरातील जागेवर रखवालदार माळवदकर कुटुंबाने अतिक्रमण केले असून त्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग समितीच्या वतीने न्यायालयीन लढाई लढत आहे. भीमा कोरेगाव जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागा ही न्यायालतीन वादात असल्यामुळे प्रत्येक वर्षी मागील सहा वर्षापासून १जानेवारी शौर्य दिन कार्यक्रमासाठी न्यायालयीन परवानगी घ्यावी लागते. याची कुठलीही माहिती आंबेडकरी समाजाला माहीत नाही व त्यांनी ही कुणाला विचारला नाही. केवळ १ जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाच्या वेळी भीमा कोरेगावला जातात व नंतर वर्षभर विसरून जातात. शौर्यदिनासाठी न्यायलयीन परवानगी ही प्रक्रिया बंद करायची असेल व हा जयस्तंभ अतिक्रमणातून मुक्त करायचा असेल तर आपल्याला भीमा कोरेगाव चा विजयस्तंभ आणि परिसरातील जागा अतिक्रमण मुक्त केली पाहिजे. आंबेडकरी समाजातील सर्व राजकीय पक्ष, संघटना आणि संस्थांनी आपसातील व्यक्ती द्वेष, मतभेद बाजूला ठेवून या लढ्यास भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांना साथ द्यावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ पँथर अण्णासाहेब रोकडे यांनी कल्याण येथे केले.
मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांची एक मुलाखत घेतली होती व या मुलाखतीत दादाभाऊ अभंग यांनी सांगितले होते की ही न्यायालयीन लढाई ही लोकाभिमुख व समाजाभिमुख झाली पाहिजे. नेमका या जमिनीचा वाद काय आहे व पुढील आपली रणनीती काय असावी हे समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आपण जनजागृती अभियान राबवावे याचाच भाग म्हणून रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ट नेते अण्णासाहेब रोकडे व कल्याण डोंबिवली मनपा चे माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांनी विठ्ठलवाडी येथे माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. अनेकांनी आपापली मते मांडली. न्यायालयीन प्रक्रियेमधील नेमका वाद काय आहे व तो कसा सुटू शकेल हे समजून घेतले व पुढील न्यायालयीन रणनीती यावर चर्चा केली या लढ्यामध्ये आम्ही सर्व सोबत असू असे कल्याण डोंबिवली मनपाचे माजी नगरसेवक व आंबेडकरी चळवळीचे नेते महादेव रायभोळे यांनी सांगितले या बैठकीला ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, कल्याण डोंबिवली मनपा चे माजी नगरसेवक महादेव रायभोळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव गवळी, सामाजिक कार्यकर्ते बाळा बनकर, फुले -शाहू -आंबेडकर विचार महिला मंच च्या अध्यक्षा सरस्वतीताई राक्षे, खजिनदार अर्चनाताई कदम आदी मान्यवर उपस्थित होते
