मुंबई: महाराष्ट्र राज्यातील व विशेषतः मुंबई रेल्वे परिसरातील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन न करता रेल्वेने तोडक कारवाई करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. डोंबिवली मधील सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टीवासियांना नोटीसा आल्या होत्या. या नोटीसा विरोधात ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व कल्याण डोंबिवली जिल्हा झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उघडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी पत्र व्यवहार करून डोंबिवली येथील रेल्वे ट्रॅक जवळील सिद्धार्थ नगर ही झोपडपट्टी तोडण्याच्या कारवाई तात्पुरती स्थगित केली आहे. याच विषयासंदर्भात आज दिनांक २९/१२/२०२३ रोजी नामदार रामदास आठवले यांनी मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना ना. आठवले यांनी सांगितले की प्रथम झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करा मग ते राज्य शासनाने करावे की रेल्वे प्रशासनाने करावे दोघांपैकी कोणीही करा परंतु झोपडपट्टीवासियांना त्यांचा निवारा द्या अशा प्रकारचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना नामदार रामदास आठवले यांनी दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया बघून झोपडपट्टीवसियांचे पुनर्वसन करण्यात येईल व जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत झोपडपट्टीवासियांवर कुठलीही कारवाई केली जाणार नाही असे या बैठकीत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.डोंबिवली सिद्धार्थ नगर मधील हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील होता आणि मुख्यत्वा याच विषयासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथी मध्ये घेण्यात आली होती. नामदार रामदास आठवले यांचे डोंबिवलीतील सर्व सिद्धार्थ नगर झोपडपट्टीवासियानी आभार मानले आहे. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव व ठाणे प्रदेशचे निरीक्षक सुरेश बारसिंग, मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, राज्य सचिव सुमित वजाळे, झोपडपट्टी महासंघाचे भीमराव कांबळे, तसेच ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माणिकराव उघडे, तसेच युवक आघाडीचे विकास खैरनार व समाजसेवक शिवा पवार उपस्थित होते.
